
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा झाल्यानंतर उत्सुकता असते ती प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाची (Exam-Analysis) आणि निकालाची. या ब्लॉगमध्ये Embibe च्या तज्ञांनी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे केले जाते यावर सखोल माहिती दिली आहे, आम्हाला आशा आहे की हा ब्लॉग आपल्याला नक्कीच आवडेल.
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10 वी च्या प्रश्नपत्रिका, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निश्चित करत असते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये 2022-23 या शैक्षणिक सत्रातील परीक्षेच्या सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.
इयत्ता 10 वी बोर्डची परीक्षा ही 2023 मध्ये अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधी होईल. विद्यार्थी आपल्या शालेय कालावधीमध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेची तयारी करत असतात. परिणामी एक वर्ष पूर्वीपासूनच याची तयारी ही सुरू होत असते. विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळविण्याकरिता या परीक्षेतील गुण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. जर विद्यार्थ्यांना मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाबद्दल माहीत असेल, तर यावर्षी SSC परीक्षेमध्ये येणार्या प्रश्नांचे स्वरूप तसेच विचारल्या जाणार्या प्रश्नांचा प्रकार लक्षात येण्यास नक्कीच मदत होते. परिणामी 2023 मध्ये येणार्या आगामी परीक्षेच्या तयारीकरिता आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याकरिता या विश्लेषणाचा फायदा होईल.
परीक्षेची काठिण्य पातळी, सर्व विषयांतील संभाव्य गुण, टॉपिक आणि गुणांची विभागणी याबद्दल विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाद्वारे अंदाज येऊ शकतो. SSC परीक्षेमध्ये दोन विषयांच्या पेपरच्या दरम्यान एखाद्या वेळी कोणताही पेपर नसतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांनी या वेळेचा योग्य तो वापर करून घेतला पाहिजे. आता आपण विषयानुसार प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते याचे विश्लेषण करू.
विज्ञान आणि तंत्रज्ञान:
विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे; भाग-1 आणि भाग-2. हा पेपर एकूण 100 गुणांचा असून, लेखी पेपर 80 गुणांचा निश्चित केलेला असतो तसेच, 20 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दिलेले असतात. प्रात्यक्षिक परीक्षा ही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये द्यावी लागते. 80 गुणांपैकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 करीता 40 गुण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 करीता 40 गुण अशा प्रकारची विभागणी केलेली आहे.
या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, बहुपर्यायी प्रश्न, शास्त्रीय कारणे द्या, रिकाम्या जागा, वस्तुनिष्ठ प्रश्न, बरोबर की चूक इ. पद्धतीच्या प्रश्नांचा समावेश होतो. यासोबत विज्ञान विषयामध्ये आपल्याला विविध प्रयोग, सूत्रे, शास्त्रज्ञांची नावे, रसायनांची नावे, वनस्पती-प्राण्यांची नावे यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 आणि भाग-2 या दोन्ही विषयाकरिता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एकसारखेच असते. प्रश्नपत्रिकेमधील गुणांची विभागणी खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे असते.
प्रश्नांचा प्रकार | एकूण प्रश्न | प्रश्नास असलेले गुण |
---|---|---|
एक गुण असलेले प्रश्न | 10 | 10 |
दोन गुण असलेले प्रश्न | 5 | 10 |
तीन गुण असलेले प्रश्न | 5 | 15 |
पाच गुण असलेले प्रश्न | 1 | 5 |
एकूण गुण | 40 |
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 करीता गुणांची विभागणी:
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 यामध्ये, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश होतो. या विषयानुसार होणारे गुणांचे विभाजन:
विषयाचे नाव | गुणांची टक्केवारी (अंदाजे) |
---|---|
भौतिकशास्त्र | 60% |
रसायनशास्त्र | 30% |
पर्यावरण | 10% |
या टक्केवारीवरून आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 मधील धड्यांनुसार होणारे गुणांचे विभाजन जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 करीता गुणांची विभागणी
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरण अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश होतो. या विषयानुसार होणारे गुणांचे विभाजन:
विषयाचे नाव | गुणांची टक्केवारी (अंदाजे) |
---|---|
जीवशास्त्र | 50% |
रसायनशास्त्र | 40% |
पर्यावरण अभ्यास | 10% |
गणित:
गणित विषयाचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे; भूमिती आणि बीजगणित. हा पेपर एकूण 100 गुणांचा असून, लेखी पेपर हा 80 गुणांचा असतो तसेच, 20 गुण हे तोंडी परीक्षेस तसेच अंतर्गत स्वाध्यायास दिले जातात. तोंडी परीक्षा किंवा स्वाध्यायावर आधारित परीक्षा ही विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्येच द्यावी लागते. 80 गुणांपैकी, भूमिती विषयास 40 गुण आणि बीजगणित विषयास 40 गुण अशा प्रकारची विभागणी केलेली आहे.
गणित विषयामध्ये आपल्याला विविध आकृत्या, सूत्रे, अंकगणितीय आकडेमोड आणि आलेख यांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. यामध्ये शाब्दिक प्रश्न, आकृत्या संरेखन, बहुपर्यायी प्रश्न यांसारख्या प्रश्न प्रकारांचा समावेश होतो.
बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयाकरिता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे एकसारखेच असते. प्रश्नपत्रिकेमधील गुणांची विभागणी खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे असते.
प्रश्नांचा प्रकार | एकूण प्रश्न | प्रश्नास असलेले गुण |
---|---|---|
एक गुण असलेले प्रश्न | 5 | 5 |
दोन गुण असलेले प्रश्न | 4 | 8 |
तीन गुण असलेले प्रश्न | 3 | 9 |
चार गुण असलेले प्रश्न | 2 | 8 |
पाच गुण असलेले प्रश्न | 2 | 10 |
एकूण गुण | 40 |
भूमिती विषयाकरिता गुणांची विभागणी:
भूमिती विषयामध्ये एकूण 7 धडे असून, आता आपण धड्यांनुसार होणार्या गुणांच्या विभाजनावर एक नजर टाकूया:
धड्याचे नाव | गुणांची टक्केवारी (अंदाजे) |
---|---|
समरूपता | 15% |
पायथागोरसचे प्रमेय | 12% |
वर्तुळ | 12% |
भौमितिक रचना | 10% |
निर्देशक भूमिती | 10% |
त्रिकोणमिती | 11% |
महत्त्वमापन | 10% |
वरील तक्त्त्यावरून आपल्याला असे दिसेल की अधिकतर धड्यांना साधारणतः समान गुण आहेत. खरे तर ही चांगली गोष्ट आहे, कारण जर प्रत्येक धड्यास असणार्या गुणांमध्ये तफावत असेल तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अवघड होऊ शकते. नेहमीप्रमाणे, परीक्षकांचा आवडता धडा जर ‘समरूपता’ हा असेल तर सगळ्यांना माहीत आहे, त्या खालोखाल पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, त्रिकोणमिती महत्त्वाचे आहेत.
या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘अभ्यासक्रमा बाहेरील’ कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये मात्र थोडा विचार करण्यास लावणारे प्रश्न विचारले जातात, परंतु जे विद्यार्थी पुस्तकात असलेल्या स्वाध्यायातील प्रश्न नियमित सोडवितात त्या विद्यार्थ्यांना अशा प्रश्नांची उत्तरे अगदी सहज देता येतात.
बीजगणित विषयाकरिता गुणांची विभागणी:
बीजगणित विषयामध्ये समीकरणे, आलेख, सांख्यिकी यांसारख्या धड्यांचा समावेश होतो. बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील भूमितीच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच असते. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांनुसार या विषयांतील धड्यांसंबंधित गुणांची विभागणी कशा प्रमाणे असते हे आता आपण पाहू:
धड्याचे नाव | गुणांची टक्केवारी (अंदाजे) |
---|---|
दोन चलांतील रेषीय समीकरणे | 21 |
वर्गसमीकरणे | 11 |
अंकगणिती श्रेढी | 15 |
अर्थनियोजन | 11 |
संभाव्यता | 11 |
सांख्यिकी | 11 |
वरील तक्त्यावरून आपल्या असे लक्षात येईल की, ‘दोन चलांतील रेषीय समीकरणे’ या धड्यास एकूण गुणांपैकी सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे. तसेच या धड्यानंतर ‘अंकगणिती श्रेढी’ हा धडा महत्त्वाचा असल्याचे दिसते. तर उर्वरित धड्यांकरिता समान गुणांकन देण्यात येते. ‘सांख्यिकी’ आणि ‘संभाव्यता’ हे धडे विद्यार्थ्यांच्या आवडीचे असून या धड्यांवर येणार्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना देता येतात.
समाजिक शास्त्र विषयाकरिता गुणांची विभागणी:
समाजिक शास्त्र विषयांमध्ये इतिहास-नागरिकशास्त्र आणि भूगोल-अर्थशास्त्र या विषयांचा समावेश होतो. या दोन्ही विषयांची मिळून 80 गुणांची परीक्षा घेतली जाते. विषयानुसार गुणांचे विभाजन कसे होते ते आपण पाहू:
विषयाचे नाव | संरेखित केलेले गुण |
---|---|
इतिहास | 28 |
नागरीकशास्त्र | 12 |
एकूण | 40 |
भूगोल | 28 |
अर्थशास्त्र | 12 |
एकूण | 40 |
गुणांच्या या विभाजनानुसार आपल्याला संपूर्ण विषयाचा किती अभ्यास करणे गरजेचे आहे हे लक्षात येण्यास मदत होते.
इंग्रजी विषयाकरिता गुणांची विभागणी:
इंग्रजी विषय हा प्रथम भाषा म्हणून गणला जातो. या विषयाची परीक्षा ही 100 गुणांची असते. या 100 गुणांचे विभाजन कशा प्रकारे केलेले आहे ते आपण पाहू:
परीक्षा पद्धती | विभाग | गुण |
---|---|---|
लेखी परीक्षा | वाचन कौशल्ये (अभ्यासक्रमातील) | 20 |
वाचन कौशल्ये(अभ्यासक्रमा बाहेरील) | 20 | |
व्याकरण | 15 | |
लेखन कौशल्ये | 25 | |
प्रात्यक्षिक/अंतर्गत परीक्षा | तोंडी परीक्षा | 20 |
एकूण | 100 |
भाषा विषयाकरिता गुणांची विभागणी:
भाषा विषयांकरिता बोर्डाद्वारे काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन गुणांचे वितरण केले जाते ते खालीलप्रमाणे आहे.
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
वाचन कौशल्य (पाठ्यपुस्तकावर आधारित व त्याव्यतिरिक्त) | 40% |
व्याकरण | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता 10 वी च्या प्रश्नपत्रिका या दीर्घ नसतात. विद्यार्थ्यांनी जर पुरेसा सराव केला तर दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे लिहिणे सोपे होऊ शकते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेमध्ये विचारल्या जाणार्या प्रश्नांचे स्वरूप त्यासोबत त्याकरिता असलेले गुण यांचा जर आपण विचार केला तर अगदी सहजपणे आपण ठरविलेल्या गुणांचे ध्येय गाठू शकतो.
प्र 1. विज्ञानाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक कधी समजेल?
उत्तर. विज्ञानामध्ये, 20 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षांकरिता संरेखित केलेले असून. ही परीक्षा शाळेद्वारे घेण्यात येते. म्हणूनच विज्ञानाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक हे शाळेकडून जाहीर करण्यात येते.
प्र 2. बीजगणित विषयामधील एकूण किती धडे अभ्यासणे महत्त्वाचे आहे?
उत्तर. बीजगणित विषयामधील सर्वच धडे महत्त्वाचे आहे परंतु दोन चलांतील रेषीय समीकरणे आणि अंकगणिती श्रेढी हे या धड्यांकरिता सर्वाधिक गुण आहेत.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?
उत्तर. इयत्ता 10 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते.
प्र 4. विशिष्ट विषयाचे दिलेले गुण विभाजन लक्षात घेणे किती महत्त्वाचे आहे?
उत्तर. एखाद्या विषयामध्ये दिलेले गुणांचे विभाजन लक्षात घेतल्यास, त्या विषयाचे नियोजन करण्यास मदत होते. परिणामी गुण विभाजनाच्या आधारे कोणते धडे महत्त्वाचे आहेत हे समजते.
Embibe वरील ‘टेस्ट’ पेजच्या मदतीने आपण आपल्या परीक्षांच्या सरावाकरिता ‘स्वतःची टेस्ट तयार करा’ या फिचरच्या माध्यमातून कस्टम टेस्ट तयार करू शकता. यांमधील टेस्टचे स्वरूप हे बोर्ड परीक्षेच्या स्वरूपासारखेच आहे. आमच्या https://www.embibe.com/test/home या लिंकवर क्लिक करून आपण टेस्ट देऊ शकता.