
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 22, 2022सातवीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी आपल्या पुढील शिक्षणाचा पाया भक्कम करण्याची उत्तम संधी असते. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून तसेच शिक्षकांकडून त्यांच्या परीक्षेत यश कसे मिळवायचे याबद्दल टिप्स मिळत असतात. परंतु, सर्व विषयांचा केवळ अभ्यास पूर्ण करणेच पुरेसे नसते तर ते आपल्या उत्तरपत्रिकेत मांडण्याचे योग्य कौशल्य असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे Embibe चे तज्ञ महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या परीक्षेत उत्तर लेखनाची मार्गदर्शक तत्त्वे यावर आधारित ब्लॉग लिहून आपल्याला उत्तरलेखनात येणारी अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या ब्लॉगमधील टिप्स आपल्याला आपल्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करण्यात, आपले उत्तर लेखनाचे कौशल्य सुधारण्यात आणि चांगले गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील.
परीक्षेविषयी: परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांची तारांबळ उडणे साहजिक असते. पण जर ते अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करून नियमित अभ्यास व उत्तर लेखनाचा सराव करत असतील तर त्यांना काळजी करण्यासारखे काहीही नसते! या इयत्तेमध्ये इतिहास व नागरीकशास्त्र, भाषा, सामान्य विज्ञान या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया घातला जात असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व विषयांकडे पूर्ण लक्ष देणे महत्त्वाचे असते.
7 वी ची परीक्षा ही 8 वी, 9 वी, आणि 10 वीमध्ये समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचा पाया असते. म्हणूनच इयत्ता सातवीमध्ये शिकवला जाणारा सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक अभ्यासला पाहिजे. इयत्ता सातवीच्या सहामाही व वार्षिक अशा दोन मुख्य परीक्षा घेतल्या जातात. सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन वेळा घटक चाचणी घेतली जाते. त्यामुळे परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांना जाणवणारा ताण कमी करण्यासाठी, त्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे तसेच, त्यांनी आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच सराव याचा कटाक्षाने पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे असते.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: इयत्ता 7 वी च्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच अभ्यासाचे नियोजन करून त्याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. या परीक्षेतील प्रत्येक पेपर 100 गुणांचा असतो. परंतु इयत्ता 7 वी च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विषयानुसार वेगवेगळे असते. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, जोड्या जुळवा, रिकाम्या जागा भरा, कारणे द्या, शाब्दिक उदाहरणे आणि निबंध लेखन असे प्रश्न समाविष्ट केलेले असतात.
विषय | गुणांचे वितरण |
---|---|
भाषा विषय | 100 (80+ 20) |
इंग्रजी | 100 (80+ 20) |
गणित | 100 (80+ 20) |
सामान्य विज्ञान | 100 (80+ 20) |
सामाजिक शास्त्र | 100 (80+ 20) |
विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता कितीही तयारी केली असली तरी मुख्य परीक्षेच्या वेळी त्यांनी लिहिलेली उत्तरे कशा प्रकारे लिहिली होती, त्यावर त्यांच्या त्या-त्या विषयांचे गुणांकन अवलंबून असते. असे बरेचदा दिसून येते की, परीक्षा केंद्रावर गेल्यावर विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिताना सरावाचा अभाव असल्यामुळे अधिक ताण जाणवत असतो. परिणामी त्यांना त्यावेळी आलेल्या ताणामुळे त्यांनी केलेला अभ्यास विसरण्याची दाट शक्यता असते व शेवटी अभ्यास करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांची उत्तर लेखनाची पद्धती नेमकी कशी असावी हे आपण पाहूया:
प्रत्येक परीक्षेपूर्वी आपण जो अभ्यास केला आहे त्याची उजळणी करणे महत्त्वाचे असते. तसेच त्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे देखील खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच परीक्षेकरिता निश्चित केलेल्या अभ्यासक्रमामधील महत्त्वाच्या धड्यांची तसेच कॉन्सेप्टची एक यादी तयार करा आणि त्या धड्यांची उजळणी करण्यास प्रथम प्राधान्य द्या. आपण महत्त्वाच्या धड्यांची आणि कॉन्सेप्टची यादी तयार करताना संबंधित शिक्षकांची मदत घेऊ शकता. तसेच प्रत्येक धड्यावर नोट्स तयार करून त्याचे नियमित वाचन करा त्यामुळे उजळणी करताना आपला गोंधळ न उडता अधिक चांगल्या प्रकारे सराव होण्यास आपली मदत होईल. असे केल्याने आपल्याला त्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवणे सोपे होईल. आपण जितकी अधिक उजळणी कराल तेवढी आपली सविस्तर उत्तर लिहिण्याची तयारी होईल. येथे अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते की, आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा नियमित सराव करत असाल तर नक्कीच आपल्याला परीक्षेत बसल्यावर प्रशपत्रिका सोडवताना कोणतेही दडपण न येता त्यातील प्रश्न सहज सोडवता येतील.
बऱ्याचदा असे होते की विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारलेला प्रश्न योग्य प्रकारे समजलेला नसतो. नेमके विचारले काय आहे हे जाणून न घेता विद्यार्थी केवळ प्रश्नपत्रिका वाचून उत्तरे लिहिण्याची सुरुवात करतात. ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. अशा पद्धतीने लिहिलेली उत्तरे शिक्षकांच्या लगेच लक्षात येतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आधी प्रश्न समजून घेतला पाहिजे. तसेच प्रश्न ज्या स्वरूपाचा विचारला आहे, त्याच स्वरूपामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणतेही उत्तर लिहिताना उत्तराची प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि शेवट या तीन पायर्या लक्षात घेऊन उत्तर लिहिणे आवश्यक असते. प्रश्नपत्रिका मिळताच लगेच लिहायला सुरुवात करण्याची घाई अजिबात करू नका. सुरुवातीची पाच मिनिटे संपूर्ण प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचण्यासाठी द्या. आपल्याला ज्या प्रश्नांचे उत्तर येत असेल ते प्रश्न आधी सोडवण्यास सुरुवात करा, असे केल्याने आपला आत्मविश्वास वाढून परीक्षेबद्दलचा ताण कमी होईल. उत्तर देताना मधेच अडकण्याची शक्यता असते. असे झाल्यास घाबरू नका किंवा हताश होऊ नका. प्रश्न पुन्हा वाचा आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अजूनही व्यवस्थित उत्तर आठवत नसेल तर तर त्या विशिष्ट प्रश्नावर वेळ व्यर्थ न घालवता पुढील प्रश्नाचे उत्तर लिहिण्यावर लक्ष केंद्रित करा. आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झाल्यानंतर तो राहिलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. अशा पद्धतीचे उत्तर लेखन केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित मुद्देसूद व नीटनेटकी उत्तरे लिहिण्याची सवय होण्यास मदत होते. तसेच या सवयीचा लाभ विद्यार्थ्याला पुढील काही वर्षांमध्ये येणाऱ्या बोर्ड च्या परीक्षेसाठी देखील होतो.
परीक्षा जवळ आली असताना, तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत ज्या तुम्हाला चांगला अभ्यास करण्यास उपयुक्त ठरतील. परीक्षेची तयारी करत असताना, आपल्या सोबतच्या मित्राची किती तयारी झालेली आहे हे अजिबात जाणून घेऊ नका किंवा त्यांच्याशी बरोबरी करून दुःखी होऊन आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. अर्थातच प्रत्येक विद्यार्थ्याची स्मरणशक्ती, आकलनशक्ती व ग्रहणशक्ती ही व्यक्तीप्रमाणे वेगवेगळी असते, परिणामी प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करण्यास समान वेळ लागत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला आपली अभ्यासातील क्षमता माहीत असते. त्यामुळे आपण आधी आपल्या अभ्यासाची पातळी जाणून घ्यावी. त्या आधारावर आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार अभ्यासाच्या वेळेचे नियोजन तुम्ही केले पाहिजे. परीक्षेच्या आदल्या रात्री लवकर जागरण न करता झोपण्याच्या वेळेपूर्वीच लवकर आपली उजळणी करा. त्यानंतर अभ्यासासंबंधीत नवीन काहीही शिकण्याचे किंवा वाचण्याचे टाळा. आपल्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी किमान सहा तासांच्या विश्रांतीची आवश्यकता असल्याने रात्री लवकर झोपा. असे केल्याने आपले परीक्षेच्या वेळी एकाग्रता टिकून राहण्यास व ताण कमी होण्यास मदत होईल.
दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. प्रश्नाच्या आवश्यकतेनुसार आपले उत्तर मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक माहिती असलेले मोठे परिच्छेद लिहिणे टाळा. आपले उत्तर शिक्षकाला लगेच समजेल असे ठेवा. तुम्ही शेवटचे उत्तर लिहिल्यानंतर, परीक्षा हॉलमधून बाहेर पडण्याची घाई करू नका. तुम्ही काही निष्काळजी चुका केल्या आहेत का किंवा कोणताही प्रश्न चुकून सोडला आहे का हे तपासण्यासाठी शेवटच्या काही मिनिटात सर्व उत्तरांची उजळणी करा.
परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरांकरिता गुण वजा केले जात नसल्यामुळे ज्या प्रश्नांबद्दल आपल्याला आत्मविश्वास नाही अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास घाबरू नका, कारण चुकीचे उत्तर देऊन सुद्धा आपले गुण वजा होणार नसल्याने उत्तरे लिहीत असताना मनात भीती बाळगू नका.
हे लक्षात ठेवा –
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेसाठी मला सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत का?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी ची परीक्षा देताना सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये कोणत्याही अयोग्य उत्तराकरिता गुण वजा केले जात नसल्याने आपण प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्र 2. गणिताचा पेपर सोडवताना तो वेळेत पूर्ण करण्यासाठी मी कोणती काळजी घेतली पाहिजे?
उत्तर. आपण मागील वर्षांच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकांचा सुरुवातीपासूनच चांगला सर्व केला पाहिजे. असे केल्याने आपला पेपर कोणत्याही दडपणाशिवाय वेळेत सोडवून होईल.
प्र 3. विज्ञान आणि गणित या विषयांची उत्तरे मी अधिक चांगल्या पद्धतीने कशी लिहू शकतो?
उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांची उत्तरे अधिक योग्य प्रकारे लिहिण्याकरिता आपल्याला प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या सहाय्याने आणि मुद्देसूद लिहिणे आवश्यक आहे.
प्र 4. मला पेपरमध्ये कठीण प्रश्न सोडवताना खूप वेळ लागतो, मी काय करावे?
उत्तर. आपण कठीण वाटणाऱ्या कॉन्सेप्ट्स नीट समजून घेतली पहिजेत व त्यावर शक्य तितका सराव केला पाहिजे, असेल केल्याने अशा प्रश्नांवर आपला अधिक वेळ खर्च होणार नाही.
प्र 5. मी विज्ञानातील महत्त्वाच्या संज्ञा लक्षात राहण्यासाठी काय केले पाहिजे?
उत्तर. विज्ञानातील महत्त्वाच्या संज्ञा लक्षात राहत नसतील तर काळजी करू नका, त्यासाठी एका सोप्या पद्धतीचा अवलंब करा. सर्व महत्त्वाच्या संज्ञा लिहून काढा. त्या भिंतीवर पोस्टर प्रमाणे नेहमी दिसतील अशा ठिकाणी चिकटवा व त्यांची येता जाता उजळणी करत रहा. असे केल्याने आपल्याला त्यासाठी वेगळा वेळ देण्याची आवश्यकता राहणार नाही व आपल्याला संज्ञा देखील लक्षात राहतील.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – काय करावे आणि काय करू नये
सहावीनंतर आता सातवीच्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल. आपण स्वतः तयारीसाठी, सरावासाठी जास्तीत जास्त वेळ देणे हे केव्हाही उत्तम. यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे नियमितता आणि शिस्त! अभ्यास सत्रांदरम्यान, आपल्या विचारांना थोडा विराम द्या. स्वतःवर आणि आपल्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परिणामांची पर्वा न करता आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. आपण खालील मुद्दे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या सातवीच्या अभ्यासाचे नियोजन करा:
काय करावे:
काय करू नये:
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेची उत्तर लेखनाची मार्गदर्शक तत्त्वे” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.